नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - एकाच सोसायटीतील दोन घरांच्या दरवाजांचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 11 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेल्याची घटना उंटवाडी येथे घडली.
याबाबत विजय गुलाबराव सोनवणे (रा. सेजल रेसिडेन्सी, उंटवाडी) यांच्या राहत्या घरी ते घरी नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या हॉलच्या खिडकीचे दोन गज कापून घरात प्रवेश केला व बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडून लॉकरमध्ये असलेली 84 हजार रुपये किमतीची 24 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 2 हजार 800 रुपये किमतीचे 70 ग्रॅम वजनाचे पायातील जोडवे, 8 हजार रुपये किमतीचे कॉईन, 400 रुपये किमतीचा लक्ष्मीचा चांदीचा कॉईन, तसेच फिर्यादीच्या शेजारी राहणारे शिरीष बागडे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.
घरातील कपाटात असलेली 20 हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 40 हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व एक हजार रुपये किमतीचे कॉईन असा 61 हजार रुपयांचा ऐवज मिळून दोन्ही घरफोड्यांमध्ये 1 लाख 56 हजार 200 रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गुडे करीत आहेत.