फलटण येथे महिला डॉक्टरांच्या मृत्यूप्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. मृत तरुणीने आत्महत्यापुर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये
प्रशांत बनकर, पीएसआय गोपाळ बदने यांचा समावेश आहे. या प्रकरणात रोजच नवे खुलासे होत आहे. त्यासोबतच तरुणीबाबत अनेकांकडून चुकीची वक्तव्ये करण्यात येत आहे. यावर तरुणीच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील अशी संतप्त प्रतिक्रिया मृत महिला डॉक्टरच्या वडिलांनी दिली. सुरुवातीला मला घटनाच सांगण्यात आली नाही, मला तिच्या जवळच येऊ दिले नाही असाही आरोप त्यांनी केला. माझ्या लेकराला कसं मोठं केलं हे मी शब्दात सांगू शकत नाही असं म्हणत तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.
तुम्ही चांगलं राहा, मी चांगली राहते. या भाऊबिजेला घरी येते असं शेवटचं बोलणं झाल्याचं मृत डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. त्या एसआयटीमध्ये महिला अधिकारी असावी आणि हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावं अशी मागणी महिला डॉक्टरच्या वडिलांनी केली.
आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप वडिलांनी केला. माझ्या मुलीचा ज्यांनी छळ केला, ज्यांनी त्रास दिला त्यांना फाशी झाली पाहिजे. या प्रकरणात खासदार-आमदार जो कोणी असो, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी केला.