मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील भाईंदर भागात एका सराफाची हत्या करण्यात आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतो अबोनी पॉल (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भाईंदर पूर्व येथील एस.व्ही. रोड परिसरात पॉल यांचा सोन्याच दुकान आहे. पॉल यांचा काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता त्यामुळे ते दुकानातच राहत होते.
दरम्यान, बुधवारी सकाळी त्यांनी दुकान उघडलं नसल्याने कामगारांनी आणि कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर काही नागरिकांनी दुकानाची काच फोडून आत प्रवेश केला. यादरम्यान पॉल हे मृत अवस्थेत आढळले.
याबाबत क्षणाचाही विलंब न करता स्थानिकांनी पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.यासंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली. हत्येमागचं नेमकं कारण काय? तसेच हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.