पंढरपुरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेयसीच्या चुलत्याने त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने भर रस्त्यावर चुलत्यावर कोयत्यानं वार करत प्राणघातक हल्ला केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रेयेसीच्या चुलत्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. भर रस्त्यावर सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये नाना निमकर गंभीर जखमी झाले असून, गंभीर हल्ला घडल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यात जखमी झालेले नाना निमकर सकाळी मोटारसायकलवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात होते. यादरम्यान, संशयित आरोपी अमित वाठारकर याने गाडी निमकर यांची गाडी अडवली. नंतर धारदार कोयता बाहेर काढत सपासप वार केले. ही घटना घडतच असताना एक वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
आरोपी जेव्हा कोयत्याने निमकर यांच्यावर वार करत होते. तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानं धाव घेत, त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.