छत्रपती संभाजीनगर : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
दरम्यान सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच EVM मशिनमध्ये बिघाड झाल्याचं दिसून आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होतानाच मोठा अडथळा उभा राहिला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 25 ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला.
ईव्हीएम मशीन बंद असल्याने सकाळी मतदानाला आलेल्या मतदारांचा हिरमोड झाला. अखेर या 25 ठिकाणी नव्या ईव्हीएम मशीन लावून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे सकाळी सात वाजता मतदानाला आलेल्या मतदारांना तब्बल पाऊणतास मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले.
तर पुण्यातील वडगाव शेरी भागात असलेले मतदान केंद्रावर नागरिक खोळंबले आहेत. मतदान करण्यासाठी आलेले नागरिक गेल्या अर्धा तासांपासून रांगेत उभे आहेत. पुणे इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावरील ईव्हीएम चालत नसल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. नवीन ईव्हीएम आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील गणेश मोफत वाचनालय मतदान केंद्रावरील EVM मशीन देखील काही काळ बंद पडलं होतं.
राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने मतदार सकाळच्या वेळेत मतदान आटोपण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद राहिल्याने सकाळच्याच वेळेत मतदानाची प्रक्रिया काहीशी संथ होताना दिसली.