छत्रपती संभाजीनगर शहरात बी फार्मसी करणाऱ्या तरुणीच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील सावरगाव वायाळ येथील शेतकरी कुटुंबातील २१ वर्षीय कल्याणी परमेश्वर वायाळ या तरुणीने आत्महत्या केली आहे. ही घटना सिडको एन-७ मध्ये बुधवारी, 30 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध शास्त्रात शिक्षण घेत होती. कल्याणी काही महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास आली होती. सिडको एन-सेवन भागामध्ये भाड्याची खोली घेऊन तीन मैत्रिणींसह कल्याणी राहत होती.
दरम्यान बुधवारी सकाळी सर्व मैत्रिणींनी मिळून त्यांच्या रुममध्ये स्वयंपाक केला. जेवण बनवल्यानंतर कल्याणीच्या सर्व मैत्रिणी डबा घेऊन महाविद्यालयात गेल्या, पण यावेळी कल्याणी रुममध्येच होती. दुपारच्या वेळी मैत्रिणी घरी आल्यानंतर आवाज देऊनही खोलीतून कल्याणीने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर खिडकीतून मैत्रिणींनी डोकावून बघितलं असता कल्याणी लटकलेल्या अवस्थेत दिसली. घाबरलेल्या मैत्रिणींनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच पोलिसांच्या मदतीने तिला खाली उतरवून घाटी रुग्णाला दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.
आत्महत्या करण्यापूर्वी कल्याणीने मोबाईल खोलीतील एका फळीवर उभा करून ठेवला होता. मोबाईलची स्थिती पाहता रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठी तो तसा ठेवला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.