छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलंब्री तालुक्यातल्या निमखेडा येथे सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आहे. कारमध्ये सिलिंडरची टाकी भरताना हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून गॅस सिलिंडर टाकीची वाहतूक केली जात होती. त्यावेळी टाकीचा अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सिलिंडर टाकी कारमधून उडून थेट बाहेर पडली आणि आगीचा एकच भडका उडाला. स्फोट झाला तेव्हा अगदी १० किलोमीटरपर्यंत याचा आवाज ऐकू आला.
त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. सदर घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र एका दुकानाचे यात मोठे नुकसान झाल्याचे समजलेय.
नेमकं काय घडलं ?
कारमधून घरगुती वापरण्याचा गॅस सिलिंडर घेऊन जात असताना हा स्फोट झालाय. कारमध्ये असतानाच सिलिंडर लिक झाला होता. कुणाला काही कळणार तितक्यात सिलिंडरचा स्फोट होऊन थेट कारमधून बाहेर समोर एका दुकानावर आदळला. दुकानावर आदळल्यानंतर या सिलिंडरने पेट घेतला. यामध्ये दुकान आणि त्यातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे.