नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या घटनेमध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत. इंडोरामा कंपनीतील टॅंक दुरुस्ती करताना हा स्फोट झाला आहे. जखमी कामगारांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आलं. जखमी कामगारांवर नागपूरामधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बुटीबोरी एमआयडीसीमधील हा दुसरा स्फोट आहे. पहिला स्फोट गुरुवारी झाला होता. दुसरा स्फोट शुक्रवारी झालाय. इंडोरामा कंपनीतील टॅंक दुरुस्ती करताना हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटामध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत.
कसा झाला स्फोट?
टॅंकमध्ये वेल्डिंगचं काम सुरु असताना गुरुवारी पहिला स्फोट झाला होता. त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी पुन्हा वेल्डिंग काम करताना दुसरा स्फोट झाला आहे. या दोन्ही घटनेत सहा कामगार जखमी झाले आहेत.
स्फोटामध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर सध्या उपचार सुरू आहेत. काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्यामुळे कामगारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.