नागपूर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार बच्चू कडू यांच्याविरोधातील हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं रद्द केला आहे. कोर्टाच्या निकालानंतर चांदूर बाजार पोलिसांनी हा गुन्हा रद्द केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही घटना ९ फेब्रुवारी २०१८ रोजी चांदूर बाजार परिसरात घडली होती. या प्रकरणात भाजपचे चांदूर बाजार नगरपरिषदेचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी ही तक्रार दाखल केली होती. कडू व अन्य चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता, असा आरोप तिरमारे यांनी केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या ३०७ अन्वये गुन्हे दाखल केले. कडू यांनी हा गुन्हा रद्द करण्याच्या विनंतीसह २०१८ मध्ये उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. हे आरोप खोटे असून तिरमारे केवळ कडू यांच्याविरुद्ध खोटे आरोप करण्याची संधीच शोधत असतात. तिरमारे यांच्याविरुद्ध विविध प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आलेत. राजकीय सुडातून त्यांनी हे खोटे आरोप केलेत, असा युक्तिवाद कडू यांच्यातर्फे करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी स्वत:च हे प्रकरण मागे घ्यावे, अन्यथा न्यायालय तसा आदेश देईल, असे मौखिक निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. पोलिसांनी उत्तर दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. बच्चू कडू यांच्यातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.