वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी याठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे.
लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. आमच्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. विरोधक म्हणतात की आम्ही ही योजना बंद करू. पण आज मी इथं सांगू इच्छितो की कुणीही ही योजना बंद करू शकत नाही. आमचं सरकार सर्व वर्गातील लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे. त्यामुळे ‘आपलं सरकार, लाडकं सरकार’ झालेलं आहे, असं शिंदेंनी म्हटलं.
‘बंजारा विरासत’ बद्दल मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
आजच्या या कार्यक्रमासाठी बंजारा समाज एकत्र आला आहे. ‘बंजारा विरासत’चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, असा हा दिवस आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं. यात बंजारा समाजाचा इतिहास आणि परंपरा दाखवण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, की आदरणीय पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावं. पण तो इतर कुणाच्या नशिबात योग आला नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नशिबात तो योग होता. मोदीजी इथं आले आणि त्यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं, असं एकनाथ शिंदेंनी पोहरादेवीतील भाषणावेळी म्हटलं.