नागपूर : देशातील विमान क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. प्रवासी संख्या १३० टक्क्यांनी वाढली आहे. मोठ्या संख्येने विमानांची खरेदी करण्यात आली आहे. पूर्वी विमान कंपन्या सुरू होत होत्या आणि बंद पडत होत्या. परंतु आता विमान कंपन्यांची संख्या वाढत असून जागतिक विमानक्षेत्रात ‘टेक ऑफ’साठी भारत सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. मिहान येथील एएआर-इंडामेर एमआरओच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी नागरी उड्डयन मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एलबर्ग, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, एअरबस साऊथ एशियाचे कस्टमर सर्व्हिस हेड लॉरी एल्डर, एएआर कॉर्पच्या समूहाचे उपाध्यक्ष डेनी केलिमेन उपस्थित होते.
सिंधिया म्हणाले, भारतात जगातील सर्वात मोठे डोमेस्टिक व इंटरनॅशनल मार्केट आहे. तसेच आगामी ५ वर्षात २२० नवे विमानतळ बनविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला इंडिगोचे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटीया, माजी खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री आ. अनिल देशमुख, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, एआयईएसएलचे महाव्यवस्थापक संजय द्विवेदी उपस्थित होते.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सिंधिया म्हणाले की, २०३० पर्यंत आम्ही तिसरे स्थान मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. २०३० पर्यंत विमान प्रवाशांची संख्या १५५ मिलियनवरून ३०० मिलियनपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. गत ६५ वर्षांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मागील १० वर्षात देशात ७५ विमानतळ उभारण्यात आले आहेत.