पाटणा विमानतळावर विमान अपघाताची मोठी घटना टळली आहे. दिल्लीहून येणारं इंडिगो एअरलाईन्सचं विमान 6E-2482 लँडिंग दरम्यान धावपट्टीच्या नियुक्त टचडाऊन ठिकाणीपासून बाहेर गेलं. त्यावेळी पायलटच्या असं लक्षात आलं की उवर्रित धावपट्टीमध्ये विमानाची सुरक्षित लँडिंग होऊ शकणार नाही. यानंतर पायलटनं पुन्हा विमान आकाशात नेलं. काही वेळ आकाशात चक्कर मारल्यानंतर विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. त्यामुळे एकंदरीतच वैमानिकाच्या कौशल्याने मोठी विमान घटना होण्यापासून टळली आहे.
सोमवारी रात्री 9 च्या दरम्यान दिल्लीहून पाटणाला येणारं इंडिगो एअरलाईन्सचं विमान 173 प्रवाशांसोबत पाटणा विमानतळावर लँडिंग करणार होतं. त्यावेळी ही घटना घडली. लँडिंग करत असताना विमान धावपट्टीच्या नियुक्त टचडाऊनच्या पुढं गेलं. हे लक्षात आल्यानंतर विमानाच्या पायलटनं लँडिंग न करण्याचा निर्णय घेत विमान पुन्हा हवेत नेलं. अचानक झालेल्या या घटनेमुळं विमानातील प्रवाशांनी नक्की काय झालं? हे समजलं नाही. अखेर काही काळानं विमानानं सुरक्षित लँडिंग केल्यावर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.