विमान प्रवास करण्याचा प्रसंग अनेकांवर येतो. या प्रवाशांत कधी तांत्रिक बिघाड झाल्याच्या विचाराने अंगावर काटा उभा राहतो. एअर इंडियाचे विमान जमिनीपासून 36 हजार फुटांवर असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर विमानात असणाऱ्या प्रवाशांच्या ह्रदयाची धडधड अधिकच वाढली. आता काय होणार? या विचाराने सर्वांचे चेहरे भेदरले. मग त्या विमानात सहवैमानिक असलेल्या पुण्यातील मैत्रेयी शितोळे हिने अतिशय धिराने परिस्थिती सांभाळली. आपले कौशल्य पणाला लावले. त्यामुळे 140 प्रवाशांचा जीव वाचला.
काय घडली घटना
एअर इंडियाचे विमान आय एक्स 613 हे तामिळनाडूच्या त्रिचीहून शुक्रवारी शाहरजा येथे जात होते. विमानाने टेकऑफ घेतला. तब्बल 36 हजार फूट उंचीवर विमान होते. त्यावेळी विमानाची लँडिंग गिअरची हायड्रोलिक सिस्टीम अचानक निकामी झाली. त्यामुळे एक, दोन नव्हे तर 140 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. वैमानिकांना पुन्हा त्रिची विमानतळावरच लँडिंग करण्यासाठी सूचना केली. विमानातील पायलट क्रोम रिफादली आणि कोपायलट मैत्रेयी शितोळे यांच्यासाठी ही परिस्थिती कसोटीची होती.
विमानतळावर गोंधळ उडला. अधिकाऱ्यांनी एमर्जन्सी लॅडींगची घोषणा केली. त्याठिकाणी सुरक्षेसाठी 20 पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पायलट आणि कोपायलट यांनी विमानास सुरक्षित उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितपणे खाली उतरले आणि 140 प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. विमानाचे यशस्वी लॅडींग होताच सर्वांनी जल्लोष केला.
कोण आहे मैत्रेयी शितोळे कोण?
पुणे येथील मैत्रेयी शितोळे हिने व्यावसायिक विमान उड्डानाचे प्रशिक्षण न्यूझीलंडमध्ये घेतले. काही दिवस न्यूझीलंडमध्येच तिने व्यावसायिक पायलट म्हणून काम केले. त्यानंतर ती भारतात परत आली. तिने ग्राउंड इन्स्पेक्टर म्हणून काम सुरू केले. तिने वैमानिक होण्याआधी एयर नेव्हिगेशन, उड्डाणाच्या तांत्रिक बाबी तसेच विमान उड्डाणाच्या तांत्रिक गोष्टी यामध्ये प्राविण्य मिळवले आहे. मैत्रेयीने ताणवाखाली काम करण्याचे खास प्रशिक्षण घेतले आहे. प्रशासकीय आणि संगणकीय कामात ती निपून आहे.