दिल्ली : दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात मोठा आत्मघातकी स्फोट झाला आहे. शुक्रवारी झालेल्या या स्फोटात ४० लोक ठार झाले असून अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे. तसेच मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी मस्तुंग जिल्ह्यात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील अल-फलाह मशिदीजवळ ईद मिलाद-उल-नबीच्या मिरवणुकीला लक्ष्य करून आत्मघातकी स्फोट घडवण्यात आला आहे. या भीषण घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर जवळील रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून, घटनेची दाहकता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अद्यापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. याआधी मस्तुंग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला एक भीषण आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यात जमियत उलेमा-ए-इस्लाम फझलचे (JUI-F) नेते हाफिज हमदुल्लासह अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर महिनाभरात झालेला हा दुसरा भीषण स्फोट आहे.