अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना ; जाणून घ्या सविस्तर
अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना ; जाणून घ्या सविस्तर
img
Dipali Ghadwaje
सोलापूर : हीट ॲण्ड रन मोटार अपघातातील पीडितांना योजनेंतर्गत नुकसान भरपाईपोटी दोन लाख रुपयांची मदत करावी, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणारे सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्यातील पहिलेच प्राधिकरण ठरले आहे.

जर एखाद्या व्यक्तीस रस्ते अपघातात अज्ञात वाहनाने धडक दिली असेल आणि त्यात तो जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्यास त्याचा तपास पोलिस करतात. पण, तपास करूनही शोध लागत नसल्यास पीडिताच्या पात्र वारसाला शासनाच्या योजनेतून नुकसान भरपाई दिली जाते. त्यासाठी नियुक्त समितीकडे संबंधिताने अर्ज करणे अपेक्षित आहे.

वाहनाच्या धडकेत जखमी किंवा मृत्यूला कारणीभूत ठरल्यास पीडितांना मदत करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी एक निर्णय दिला आहे. त्यानुसार रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना २५ फेब्रुवारीला काढली आहे.

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम- १९८८ (कलम ५९, उपकलम (१)) अंतर्गत अज्ञान वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी किंवा मृत्यूस कारणीभूत ठरल्यास पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी योजनेअंतर्गत समिती नेमली आहे. त्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक यांचा समावेश आहे. या समितीची सोमवारी (ता. १३) बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर हे उपस्थित होते.

दरम्यान, कामती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अपघातात वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पळून जाणारी व्यक्ती किंवा वाहनाचा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण, वाहनाचा शोध लागला नाही. अपघातात मयत व्यक्तीची पत्नी व मुलाने योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. त्यानुसार तो अर्ज समितीसमोर ठेवण्यात आला.

समितीने गुन्ह्याची कागदपत्रे, घटनास्थळावरील पंचनामा, इनक्वेष्ट पंचनामा, पीएम रिपोर्ट, वैद्यकीय अहवाल व इतर कागदपत्रांची पडताळणी करून दोन लाख रुपयांच्या मदतीची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे (आहरण व संवितरण अधिकारी) केली आहे.

त्रिसदस्यीय समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे होते शिफारस

त्रिसदस्यीय समिती अपघाताच्या गुन्ह्याची कागदपत्रे, घटनास्थळावरील पंचनामा, इनक्वेष्ट पंचनामा, पीएम रिपोर्ट, वैद्यकीय अहवाल व इतर कागदपत्रांची पडताळणी करते. त्यानंतर मदतीची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे (आहरण व संवितरण अधिकारी) केली जाते. या त्रिसदस्यीय समितीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, निवासी उपजिल्हाधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक हे असतात.

यांनाच मिळते मदत

जर एखाद्या व्यक्तीस रस्ते अपघातात अज्ञात वाहनाने धडक दिली असेल आणि त्यात तो जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्यास त्याचा तपास पोलिस करतात. पण, तपास करूनही शोध लागत नसल्यास पीडिताच्या पात्र वारसाला शासनाच्या योजनेतून नुकसान भरपाई दिली जाते. त्यासाठी नियुक्त समितीकडे संबंधिताने अर्ज करणे अपेक्षित आहे.

- नरेंद्र जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group