इंदापूर : उजनी धरणात सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे प्रवासी वाहतूक करणारी बोट मंगळवारी (ता. २१) सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या वादळामुळे बुडाली. त्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार ४ पुरुष, दोन महिला व दोन मुलींसह एकूण आठ प्रवासी होते.
त्यापैकी एक जण पोहत कळाशी येथे आला असून, इतर सात जण बेपत्ता झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, अंधारामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे जाण्या-येण्यासाठी उजनी पात्रात बोटीद्वारे वाहतूक केली जाते. मंगळवारी सायंकाळी कुगाव येथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली, असे एकूण ७ प्रवासी आणि बोट चालक एक, असे एकूण ८ जण कळाशीकडे येण्यासाठी बोटीमधून निघाले. बोट काही अंतरावर पुढे आली असता अचानक जोरदार सुटलेल्या वादळ आणि वळवाच्या पावसाने लाटा निर्माण झाल्याने बोट उलटली, अशी प्राथमिक माहिती आहे.
या बोटीत प्रवास करत असलेले सोलापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे हे बोट उलटलेल्या ठिकाणाहून पोहत कळाशीच्या (ता. इंदापूर) किनाऱ्यालगत आले. दरम्यान, पाणी कमी झाल्याने किनाऱ्यावर गाळ जास्त असल्याने ते रुतून बसले होते. यावेळी स्थानिक नागरिकांच्या ते निदर्शनास आल्याने त्यांनी मदत करीत त्यांना बाहेर काढले. बोटीतील इतर प्रवासी बेपत्ता झाले आहेत.
दरम्यान बोट नक्की कुठे पलटी झाली, याबाबत तपास कार्य सुरू होते. मात्र, अंधार पडल्याने तपास कार्यात अडचण येत होत्या. घटनास्थळी आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी भेट दिली. तसेच, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पोलिस प्रशासन देखील त्या ठिकाणी शोध कार्य करीत आहेत.