देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण भीषण वाढले आहे. महाराष्ट्र देखील यात काही मागे नाही. हुंडाबळी असो की लग्नानंतर असणाऱ्या बाह्य संबंधातून झालेली हत्या असो, अनेकींनी तर सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे आहेत. या सर्वामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित पत्नीने नवऱ्याला तू माझ्या मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेलास असा जाब विचारला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी मिळून महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जीवंत जाळल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यात तिच्या मैत्रिणीनेही सासरच्या मंडळींनी साथ देत तिला जाळण्याचा प्रयत्न केला.
यात महिला 70 टक्के भाजली असून आता ती मृत्यूच्या दारात उभी आहे. पती आणि मैत्रिणीने आधी विवाहितेला जाळलं, नंतर सासू आणि दीर अशा चौघांनी संगनमताने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रेणापूर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.