येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केरळ येथील परिचारिका निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेला मंजुरी दिली आहे. त्यानंतर लगेचच परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, तिला शक्य ती सर्व मदत केली जात आहे.
भारतीय परिचारिकेवर येमेनच्या एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोप असून आता तिच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला मंजुरी देण्यात आली आहे. येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद मोहम्मद अल-अलिमी यांनी या शिक्षेची घोषणा केली.
नेमकं प्रकरण काय आहे?
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील ३६ वर्षीय नर्स निमिषा प्रिया २००८ मध्ये तिच्या पालकांना आधार देण्यासाठी येमेनला गेली होती. अनेक रुग्णालयांत काम केल्यानंतर तिने शेवटी स्वतःचे रुग्णालय उघडले. २०१४ मध्ये ती तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली आणि तिने तिचे स्वतःचे रुग्णालय उघडले. येमेनमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक कायद्याने स्थानिकांशी भागीदारी करणे अनिवार्य केले आहे, त्यामुळे व्यवसायात तिला तलाल अब्दो महदीची मदत झाली. या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर निमिषाने महदीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली, त्यामुळे त्याला २०१६ मध्ये अटक करण्यात आली. परंतु, त्याची सुटका झाल्यानंतरही तो तिला धमक्या देत राहिला.
२०१७ मध्ये तिचा आणि येमेनी व्यवसाय भागीदार महदी यांच्यात वाद निर्माण झाला, कारण तिने निधीचा गैरवापर करण्याच्या कथित प्रयत्नांना विरोध केला होता. निमिषाच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, तिने महदीला तिचा जप्त केलेला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन दिले होते. मात्र, अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला.
तिला देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती आणि २०१८ मध्ये तिला हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले होते.
२०२० मध्ये साना येथील एका ट्रायल कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने नोव्हेंबर २०२३ मध्ये निर्णय कायम ठेवला होता, तरीही त्यांनी ब्लड मनी हा पर्याय खुला ठेवला होता. याचा अर्थ पीडितेच्या कुटुंबाने भरपाई देणे, असा होता. त्यांनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध येमिनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु २०२३ मध्ये त्यांचे अपील फेटाळण्यात आले.
निमिषाला फाशीची शिक्षा का झाली?
येमेनी कायद्याने प्रजासत्ताकाचे स्वातंत्र्य, एकता किंवा प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणे, “सशस्त्र दलांना कमकुवत करण्याच्या उद्देशाने कृती करणे, हत्या, अमली पदार्थांची तस्करी, व्यभिचार, प्रौढांमधील सहमतीने समलैंगिक क्रियाकलाप, इस्लाम धर्म सोडणे किंवा त्याचा निषेध करणे आणि वेश्याव्यवसाय करणे, यांसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.
याच अंतर्गत निमिषा प्रिया हिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. निमिषाच्या आई यांनी खटला लढण्यासाठी तिची मालमत्ता विकली आहे, असे वकील सुभाष चंद्रन यांनी सांगितले. राजकारणी, व्यापारी, कार्यकर्ते आणि निमिषाला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत.
निमिषाच्या फाशीची शिक्षा माफ करण्याचा अथक प्रयत्न करत असताना तिची आई प्रेमा कुमारी या वर्षाच्या सुरुवातीला येमेनची राजधानी साना येथे गेल्या आणि सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिलच्या सहाय्याने पीडिताच्या कुटुंबाला दीया (ब्लड मनी) देण्याची प्रक्रिया केली. ही येमेनमधील एनआरआय सामाजिक कार्यकर्त्यांची संघटना आहे.
भारतीय दूतावासाने नियुक्त केलेल्या अब्दुल्ला अमीर या वकिलांनी २०,००० डॉलर (अंदाजे १६.६ लाख रुपये) ची प्री-निगोशिएशन फीची मागणी केल्यानंतर सप्टेंबरमध्ये पीडितेच्या कुटुंबाशी ब्लडमनीसाठी वाटाघाटी करण्याची चर्चा अचानक थांबली होती. परराष्ट्र मंत्रालयाने जुलैमध्ये अमीरला आधीच १९,८७१ डॉलर्स प्रदान केले आहेत, परंतु त्याने बोलणी पुन्हा सुरू करण्यापूर्वी दोन हप्त्यांमध्ये देय असलेली एकूण ४०,००० डॉलर्स फीचा आग्रह धरला. सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिलने आमीरच्या शुल्काचा पहिला हप्ता क्राउडफंडिंगद्वारे वाढवण्यात यश मिळवले. परंतु, नंतर या निधीचा वापर कसा केला जात आहे, याबद्दल देणगीदारांना स्पष्टीकरण देताना त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता.
परराष्ट्र मंत्रालय काय म्हणाले?
मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ते तिची सर्व प्रकारे मदत करतील. पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, “येमेनमध्ये निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेची आम्हाला माहिती आहे. आम्हाला समजले आहे की प्रियाचे कुटुंब सध्या मार्ग शोधत आहे. सरकार या प्रकरणात शक्य ती सर्व मदत करत आहे.”