नाशिक प्रतिनिधी : महिरावणी शिवारात एका 32 वर्षीय तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 26 डिसेंबर 2023 रोजी महिरावणी शिवारात लक्ष्मण शंकर जाधव (वय 32, रा. फुलेनगर, पंचवटी, नाशिक) या युवकाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला होता. त्याचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे उघडकीस आले होते.
सन 2023 मध्ये नाशिक ग्रामीण हद्दीत एकूण 76 खून झाले होते. त्यात 75 गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले होते. या खुनाचा उलगडा होत नसल्याने पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील भामरे व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
लक्ष्मण जाधवबाबत माहिती घेत असताना तो नाशिक शहरातील रहिवासी असून, काही दिवसांपासून नातेवाईकांकडे राहायला आल्याचे पोलिसांना समजले, तसेच तो कोणतेही काम करीत नसून, त्याला दारू पिण्याचे व्यसनही असल्याचे तपासात समोर आले. पोलीस पथकाने त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पडताळणी केली. त्यात लक्ष्मण हा रात्री 12 वाजेच्या सुमारास नाशिककडे एकटा पायी जात असल्याचे दिसून आले. म्हणून पोलिसांनी नाशिक ते त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल, ढाबे, लॉजेस यांची तपासणी केली असता महिरावणी शिवारातील साई प्लाझा हॉटेल येथून नीलेश सुरेश नांदे (वय 24, रा. धामणशेत, ता. मोखाडा, हल्ली मु. साईप्लाझा हॉटेल) याच्यावर संशय बळावल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
नीलेश हा साई प्लाझा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो, तसेच त्र्यंबकला येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांना जेवणासाठी थांबविण्याचे काम करीत होता. दि. 26 डिसेंबर रोजी नीलेशने लक्ष्मण जाधवला हटकले असता लक्ष्मणने त्याला शिवीगाळ केली. दोघांत झटापटही झाली. या झटापटीत नीलेशने लक्ष्मणच्या छातीवर, पोटावर व मांडीवर गंभीर वार करून त्याला जिवे ठार मारले. हे केोणाला समजू नये म्हणून त्याने हॉटेलपासून दूर अंतरावर महिरावणी शिवारात रस्त्यालगत त्याचा मृतदेह टाकून दिल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी नीलेशला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विपीन शेवाळे करीत आहेत.