छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी सकाळी खळबळजनक घटना घडली आहे. नाईट ड्यूटी करून घरी परतलेल्या एका मेहुण्याने आपल्या भावजीची लोखंडी पकडीने डोक्यात वार करून हत्या केली, तर पत्नीवरही जीवघेणा हल्ला केला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान उस्मानपुरा परिसरात घडली.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत संतोष काशिनाथ खाजेकर (वय 38, रा. म्हाडा कॉलनी, गंगापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीचे नाव बळीराम कल्याण जगधने (रा. रांजणगाव शेणपुंजी, एमआयडीसी वाळूज, ह. मु. उस्मानपुरा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बळीराम रात्री नाईट ड्यूटीवर गेल्यानंतर त्यांचे मेहुणे संतोष खाजेकर त्यांच्या घरी मुक्कामी गेले होते. पहाटे सुमारे 6:30 वाजता बळीराम ड्यूटीवरून अचानक घरी आले.
त्यावेळी संतोष घरात असल्याचे पाहून ते घाबरले आणि टेबलखाली लपले. मात्र, बळीरामने त्यांना पाहताच संतापाने संतोषला बाहेर ओढून घेतलं आणि लोखंडी पकडीने त्यांच्या डोक्यात जोरदार वार करत हत्या केली. इतक्यावर न थांबता, आरोपी बळीरामने आपल्या पत्नीवरही हल्ला केला. रागाच्या भरात त्याने सायकल उचलून तिच्या डोक्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर आरोपीच्या पत्नीने तत्काळ मुलाला फोन करून घटनेची माहिती दिली. मुलगा घटनास्थळी धावत पोहोचला असता, त्याने वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्वरित पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.