परिस्थिती समोर हतबल न होता आलेल्या संकटावर मात करत यशाला गवसणी घालणारी अनेक तरुण मुलं आहेत. ज्यांचा आदर्श अनेक जण घेत असतात. पण याच परिस्थितीसमोर हतबल होऊन अनेक जण चुकीच्या मार्गाला जातात किंवा रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलतात. लातूरमधून अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
लातूरमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने आपल्याच जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या केली. लातूरच्या चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावामध्ये ही घटना घडली. पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या तरुणाने बापाला जागीच संपवलंय. काशिनाथ पांचाळ (वय ७० वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अजय काशिनाथ पांचाळ (वय २४ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय ?
काशिनाथ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत होते.काशिनाथ यांचा मुलगा चापोली येथे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो पोलिस भरतीची तयारी करत आहे. त्याने वडिलांकडे भरतीसाठी फी भरण्यासाठी पैसे मागितले होते. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे घरातील चुलीसाठी वापरण्यात येणारी लाकडं भिजली होती. त्यात घरातील गॅसही संपला होता. त्यामुळे काशिनाथ यांनी बायकोला सिलेंडर खरेदीसाठी पैसे दिले.
यावरून काशिनाथ यांचा मुलगा त्यांना जाब विचारू लागला. यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने काशिनाथ यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान त्यांच्या डोक्याला जोरदार काठी लागली. या घटनेत अधिक रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चाकूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. पोलिस अधिक तपास करत आहेत.