लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड (वय ३५) या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या भीतीने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या घटनंतर ओबीसी समाजातून हळहळ व्यक्त होत असून या तरुणांच्या नातेवाईकाची भेट घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि धंनजय मुंडे शुक्रवारी लातूर येथे पोहचले.
यावेळी भरत कराड यांच्या कुटुंबाला भेट देताना आणि त्यांच्या मुलांना मांडीवर घेताना भुजबळांना एकाएक गलबलून आलं. घरातील स्त्रीया रडू लागल्या, मुलं कावरीबावरी झाली आणि भुजबळांनी त्यांना जवळ धरलं. त्यावेळी त्यांनाही रडू अनावर झालं. आपल्या रुमालानं त्यांनी मुलांचे डोळे पुसले. ओबीसी लढ्यात आज राग नव्हता. तर हळहळ होती. ओबीसी आरक्षण बचाव लढ्यात आजच्या चित्राने भुजबळ भावनिक झाले.
दरम्यान पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले. यावेळी बोलताना ओबीसी समाजाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले. "मिळविण्यासाठीसुद्धा अनेकांचे बलिदान झाले आहे, आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे. आम्ही सगळेच त्यात आहोत. कोर्टात लढतो आहोत, मंत्रिमंडळात लढतो आहोत. ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. माझी खात्री आहे की आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ. तुम्ही धीर सोडू नका," असे सांगत समाजाला धीर देण्यात आला.
आज भुजबळांचा येवला येथे नियोजीत दौरा होता. पण त्यांनी तो रद्द करत लातूरकडे धाव घेतली. आज सकाळीच भुजबळ या कुटुंबाला धीर देण्यासाठी गावात दाखल झाले. त्यावेळी वातावारण शोकाकूल होते. सरकारने जीआर काढताना सरकारनं आपल्याला विश्वासात घेतला नसल्याचा दावा भुजबळांनी पुन्हा केला.