महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गण प्रारूप रचनेबाबत अंतिम निर्णय झालेला नसताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी राजकीय पक्षांसह आता निवडणूक आयोगानेही तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. आयोगाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांना आपापली रणनीती तयार करण्यास मदत होणार आहे. आता आगामी काळात लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी मोठी चुरस पहायला मिळेल. जिल्हा परिषदेच्या गट व गणांचा नवीन प्रारुप आराखड्यानुसार ७४ गट व १४८ गण यंदाच्या निवडणुकीसाठी राहणार आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत व ओझर या दोन नगरपालिका झाल्याने येथील गटांची संख्या दोन ने कमी झाली आहे. तर चांदवड, सुरगाणा, व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढल्याने गटांची संख्या ७४ तर गणांची संख्या १४८ इतकी झाली आहे.
महाराष्ट्रतील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच आरक्षण जाहीर, संपूर्ण यादी
सर्वसाधारण महिला - गडचिरोली, धाराशिव, ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया,
सर्वसाधारण - नाशिक, बुलढाणा, रायगड, जळगाव , पुणे, छ. संभाजीनगर, सिंधुदुर्ग, यवतमाळ
अनुसुचित जाती महिला - बीड, चंद्रपूर
अनुसुचित जाती - वर्धा, परभणी
अनुसुचित जमाती महिला - अहिल्यानगर, अकोला, वाशिम
अनुसुचित जमाती - नंदूरबार , पालघर
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - जालना, धुळे, रत्नागिरी, सातारा, नांदेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग सोलापूर - नागपूर, हिंगोली, भंडारा