मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील द्वारका सर्कलची पाहणी केली, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. खासदार संजय राऊतांनी केलेल्या ट्विटवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मंत्री भुजबळ यांनी संजय राऊत यांना डिवचलं आहे. 4 मंत्री घरी जाणार असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं, त्यावर प्रत्युत्तर देताना आम्ही पण आता घरीच चाललो आहोत, असा उपरोधिक टोला, भुजबळ यांनी लगावला आहे.
माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची मागणी आहे, त्यावर मी काही बोलणार नाही, मला काही कल्पना, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच छावाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. याबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळलं आहे. मला काही माहीत नाही, जे झाले ते पाहिले आहे त्यांनी सांगितले, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.