लातूर पोलीस स्टेशनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे . लातूर लातूरमध्ये पोलीस ठाण्याच्या दारातच सनई वाजली आहे. चक्क पोलिसांनीच प्रेमीयुगुलाचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे.
लातूर शहरातील रामगिरी नगर येथून पळून गेलेल्या तरूणीचं तिच्या प्रियकरासोबत लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्याच्या दारातच लग्न लावून देण्यात आलं आहे. या तरूणीचं वय २० तर तिच्या प्रियकराचं वय २२ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लातूर पोलिसांनी लावलेल्या या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलवत त्यांच्या संमतीने पोलीस ठाण्याच्या दारातच १४ मे रोजी या प्रेमीयुगुलाचं लग्न लावलं आहे. या अनोख्या लग्नाची शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
लातूर शहरातील स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत रामगिरीनगर आहे. येथे राहणारी एक तरूणी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी ३० एप्रिल रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
याप्रकरणी पोलीस या तरूणीचा शोध घेत होते. त्यानंतर तपास करत पोलीस हेड कॉन्स्टेबल आरडी जाधव यांनी या तरूणीस ताब्यात घेतलं. त्यावेळी ती तिला आवडणाऱ्या तरूणासोबत असल्याचं त्यांना आढळलं. या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याची ईच्छा व्यक्त केली.
यानंतर पोलिसांनी या तरूणीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनी तिच्या आईवडिलांना समक्ष लग्नाची विचारपूस केली. यावेळी मुलीच्या घरच्यांनी लग्नाला संमती दर्शविली. मात्र, त्यांनी हे लग्न पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्ष पार पडावं असा आग्रह धरला. मुलगी आणि मुलाच्या मामाच्या विनंतीवरून हा विवाहसोहळा पोलीस ठाण्याच्या दारातच पार पडला.