सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठासह संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये होणार आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेताना त्याची माहिती जरूरी आहे. आता पदवी तीन वर्षांची नसून चार वर्षांची असणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन वर्षानंतर पदवी शिक्षण सोडणाऱ्यांना डिप्लोमाची पदवी दिली जाणार आहे.
बारावीनंतर पदवीला प्रवेश घेतल्यास एखाद्या विद्यार्थ्याला प्रथम वर्ष पूर्ण केल्यानंतर काही अडचणींमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. त्यावेळी त्या विद्यार्थ्याला एक वर्षाचे स्वतंत्र प्रमाणपत्र मिळेल. तसेच द्वितीय वर्षे पूर्ण केल्यानंतर अर्ध्यातूनच शिक्षण सोडल्यास डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. तिसऱ्या वर्षानंतर शिक्षण सोडल्यास सध्याच्या प्रचलित नियमानुसार प्रमाणपत्र मिळेल, पण चौर्थ्या वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला ऑनर्स (थेरोटीकल) किंवा रिसर्च (संशोधन विषयातून शिक्षण) डिग्री मिळणार आहे. ही पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवीसाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळेल. पण, पदवीचे शिक्षण तीन वर्षानंतर सोडलेल्यांना पदव्युत्तर पदवीला प्रवेश घ्यायचा असल्यास त्याला दोन वर्षे शिकावे लागणार आहे.
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्याला इंटर्नशिपची संधी
तीन किंवा चार वर्षांची पदवी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची (ऑन जॉब ट्रेनिंग) संधी मिळणार आहे. त्यानुसार पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षातील पहिल्या सत्रात रिसर्च मेथेडॉलॉजी तर दुसऱ्या सत्रात ऑन जॉब ट्रेनिंग (शासकीय, निमशासकीय, खासगी व बिगरशासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षण) असे विषय असतील. तर पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या सत्रात फिल्ड प्रोजेक्ट (विषय दिला जातो किंवा त्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयावर) असणार आहे. पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याला लघु शोधनिंबध बंधनकारक असून एका विषयावरील अहवाल त्याला द्यावाच लागणार आहे. तो अहवाल सादर केल्यावर त्याचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण होणार आहे.
‘डीएड-बीएड’ची प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच
इयत्ता बारावीचा निकाल २० ते २५ मे दरम्यान जाहीर होणार आहे. निकालानंतर लगेचच पुढच्या शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२४-२५ पासूनच लागू होत आहे. पण, डीटीएड व बीएडची प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम व कालावधी ‘जैसे थे’च असणार आहे. त्यासंबंधीचा बदल व अंमलबजावणी २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने होणार आहे. तूर्तास डीटीएड व बीएड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश घेता येईल, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून (डायट) सांगण्यात आले.
नवीन धोरणाची २०२४-२५च्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठासह संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये होणार आहे. धोरणातील नव्या बदलासंदर्भातील माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला समजावी या हेतूने महाविद्यालये सुरू झाल्यानंतर पहिले १५ दिवस त्यांना मार्गदर्शन केले जाईल, तशा सूचना सर्वांना दिल्या आहेत.
- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र- कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ