कोल्ड्रिंक्समधून विषारी पावडर पाजून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवलं
कोल्ड्रिंक्समधून विषारी पावडर पाजून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवलं
img
Dipali Ghadwaje
सोलापूर :  जन्मदात्या बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. विजय सिद्राम बट्टू असे मुलाची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 13 जानेवारी रोजी विशाल विजय बट्टू हा सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई, वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री 11 च्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळी विशाल बट्टू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेचच नातेवाईकांना बोलावून ओळख पटवली असता मृतदेह विशालचेच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना या प्रकरणी विशालचा घातपात झाल्याचा संशय होता.

 त्यामुळे पोलिसांनी आधी आकस्मित मृत्यूची नोंद करत या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला होता. पोलिसांनी अनेकांची चौकशी केल्यानंतर संशयाची सुई ही वडिलांकडे जात होती. त्यातच आरोपी वडील विजय बट्टू याने पत्नी कीर्ती बट्टूकडे आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे म्हटले. ही बाब लक्षात येताच कीर्ती यांनी पोलिसांना माहिती दिली.

सोलापुरातल्या जोडभावी पेठ पोलिसांनी या तात्काळ विजय बट्टू यांना ताब्यात घेतं त्यांची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर आरोपी विजय बट्टू याने आपला कबुली जबाब दिला. "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. विशालच्या सततच्या शाळेतील खोडकरपणाला, मोबाइलवर नको त्या गोष्टी पाहिल्यानं रागाच्या भरामध्ये मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून त्याला मारले." अशी कबुली आरोपी विजय बट्टू याने दिली.

घटना घडल्याच्या जवळपास 15 दिवसांनी आरोपीने स्वतःहून कबुली दिल्यानं आरोपीची पत्नी कीर्ती विजय बट्टू यांनीच पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी विजय बट्टू याने आपल्या मुलाची हत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यांच्या या फिर्यादीवरून विजय बट्टूवर भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी बट्टूला न्यायालसमोर हजर केलं असता न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलीय. अशी माहिती जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी दिली.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group