विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा!  धनगर समाजाच्या आरक्षणावरुन कार्यकर्ता आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात
विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा! धनगर समाजाच्या आरक्षणावरुन कार्यकर्ता आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात
img
Dipali Ghadwaje
सोलापूर: सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबीत असल्यानं धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळला आहे. सोलापूर शासकीय विश्रामगृहात घटना घडली आहे.  सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण, सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार . शेखर बंगाळे असे या धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी शेखर बंगाळे सोलापूरच्या विश्रामगृहावर विखे-पाटलांची भेट घेण्यासाठी आला. आपल्याला विखे-पाटील यांच्याकडे धनगर आरक्षणाचे निवेदन द्यायचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

त्यानुसार पोलिसांनी शेखर बंगाळे याला विखे-पाटलांना भेटून देण्याची परवानगी दिली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठरल्याप्रमाणे शेखर बंगाळे यांच्याकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर विखे-पाटील हे निवेदन वाचत असताना शेखर बंगाळे याने खिशातून भंडाऱ्याने भरलेला रुमाल काढला आणि तो सरळ विखे-पाटलांच्या डोक्यावर रिता केला. यावेळी त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी 'यळकोट-यळकोट जय मल्हार'च्या घोषणा दिल्या. यावेळी विखे-पाटलांच्या डोक्यावर सर्वत्र भंडारा पसरला होता.

हा सर्व प्रकार बघताच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगरक्षकांनी आणि समर्थकांनी तातडीने शंकर बंगाळे याला पकडले. या सगळ्यांनी शेखर बंगाळे याला खाली पाडून थोडीफार मारहाण केली. यानंतर पोलिसांनी शेखरबंगाळे याला ताब्यात घेतले. 

शंकर बंगाळे याने यापूर्वीही असाच प्रकार केला होता. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात शेखर बंगाळे याने सोलापूर येथील सभेत तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर भंडारा उधळला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेखर बंगाळे यांनी अशीच कृती केली आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. मात्र, या घटनेमुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काय म्हणाले विखे-पाटील 
या सगळ्या घटनेनंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, भंडारा पवित्र मानला जातो. त्यामुळे मला आशीर्वाद मिळाला आहे समजून मी आनंद मानतो. धनगर समाजाच्या संबंधित कार्यकर्त्याने केलेल्या कृतीत मला काहीही वावगे वाटत नाही. मी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा प्रकार अचानक घडल्यामुळे माझ्या काही कार्यकर्त्यांनी शेखर बंगाळे याला मारहाण केली. मात्र, आता मी कार्यकर्त्यांनाही तशाप्रकारच्या सूचना देईल, असे विखे-पाटील यांनी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group