मुंबई : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नव्याने चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात याच योजनेला केंद्रस्थानी ठेवून महायुतीने आपला प्रचार केला होता. मात्र आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी पुन्हा होणार नाही, असे राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तकटरे यांनी नेमकं काय सांगितलं?
आदिती तटकरे यांनी बोलताना सांगितले की, "लाडकी बहीण योजनेत जवळपास दोन कोटी 34 लाखाच्या जवळपास महिला लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे.
या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही. मात्र मी जेव्हा मंत्री होते, त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.