नवरात्रीनंतर दसराही गेला.तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला नाही.अद्यापही हफ्ता न आल्याने महिलांची चिंता वाढली आहे. दरम्यान आता याच संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
लाडकींना कधी मिळणार १५०० रुपये? लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, २५ ऑक्टोबरनंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दसऱ्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्याबद्दल चर्चा होऊन निर्णन घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सरकारकडून पैसे जमा होण्याची तारीख अजून जाहीर केलेली नाही.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार का? सप्टेंबरचा हप्ता रखडल्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचे पैसेही एकत्र मिळणार का, याबद्दल चर्चा सुरू आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये खात्यात जमा होण्याची अपेक्षा काही महिला व्यक्त करत आहेत. पण दोन्ही हप्ते एकत्र देण्याबद्दल कोणताही अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे या चर्चांना सध्या फक्त शक्यता म्हणूनच पाहणं गरजेचं आहे.
दिवाळीआधी महिलांना दिलासा मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत देतात. या पैशांचा सणासुदीच्या खरेदीसाठी महिलांना उपयोग होतो. त्यामुळे रखडलेल्या हप्त्याबाबत लाभार्थी महिलांचं लक्ष सरकारतच्या निर्णयाकडे लागलं आहे.