राज्यसरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दरम्यान विधासभा निवडणुकीनंतर मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार केली जाईल असे महायुती सरकरकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून पुन्हा पात्र अपात्र महिलांचा सर्वे करून त्यांची नावे कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सर्वे करण्याचे काम दिले आहे. मात्र यावर काही अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी महिन्यात 5 लाखांनी घटली आहे. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. तर, जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 लाख आहे. या योजनेसंबंधी पडताळणी सुरू झाल्याने नव्याने सर्वे होणार आहे. ती जबाबदारी पुन्हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर देण्यात आली आहे.
मात्र अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे गावात महिलांमध्ये भांडणे लागतील.महिलांची नावे कमी करण्याचे काम आम्ही करणार नाही. लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी प्रति अर्ज पन्नास रुपये प्रमाणे सरकारने मानधन देण्याचे मान्य केले होते. मात्र अद्याप पर्यंत ती रक्कम मिळालेली नाही. ती देण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.