राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता पर्यंत लाखो बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु अजूनही कागदपत्रांच्या अभावी काही भगिनी या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. दरम्यान, या योजनेत सुरुवातीला अर्ज दाखल करण्याची ३१ ऑगस्ट तारीख होती. परंतु महिलांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अर्ज दाखल करण्याची तारीख ३१ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही अनेक महिलांनी काही कारणांमुळे अर्ज दाखल केले नव्हते.
पण अशा महिलांना आता अर्ज दाखल करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महिलांना लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
या योजनेतील ऑगस्ट महिन्यात दोन हप्ते मिळाले आहेत. तर २९ सप्टेंबरपासून तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते, ज्या महिलांचे आधारकार्ड नव्हते किंवा अन्य कागदपत्रे नव्हती, अशा महिलांनी या योजनेचा अर्ज दाखल केला नव्हता. परंतु, आता या महिलांनी आधारकार्ड बँकेशी लिंक केले आहे. अन्य कागदपत्रे जमवली आहेत, अशा महिलांना नवीन अर्ज दाखल करता येणार आहेत. मुदत वाढवल्याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान , नाशिक जिल्ह्यातदेखील मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेत सहभाग घेतला असून, ज्या महिला या योजनेपासून वंचित आहेत अशा महिलांनी आपले कागदपत्र अपलोड करून नाव नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे पालकमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.