लाडक्या बहिणींना अडीच हजार रुपये दिवाळी बोनस ?  मंत्री आदिती तटकरे  यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना अडीच हजार रुपये दिवाळी बोनस ? मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...
img
दैनिक भ्रमर
राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून सुरु झालेल्या या योजनेच्या आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले. त्यामुळे आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील. मात्र, याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, सरकारकडून अजून अडीच हजार रुपये मिळणार असल्याचं वृत्तही काही वृत्तसंकेतस्थळांनी दिलं आहे. त्यामुळे अनेक महिला या अडीच हजार रुपयांची वाट पाहत आहेत. हे पैसे कधी मिळणार याबाबत या वृत्तांमध्ये काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला वर्गांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय.

दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी साधलेल्या संवादानुसार, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. बोनसबाबतचे वृत्त खोटं असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

तसंच, काही दिवासंपूर्वी मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र, याबाबतही कोणताच शासन निर्णय झालेला नाही. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक महिलांची फसवणूक होऊ शकते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनासंदर्भात अधिकृत माहिती घेण्याकरता सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खातरजमा करून घ्या. अन्यथा तुमचा आर्थिक फसवणूक होऊ शकते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group