विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाता ठरला. तसेच सुरुवातीपासूनच ही योजना चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. दरम्यान, राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. तर आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती.
दरम्यान , राज्यात आता पुन्हा एकदा महायुती सरकार आलं आहे, त्यामुळे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 2100 चा हफ्ता कधीपासून द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतला जाईल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
तसेच, अर्थसंकल्पामध्ये याबाबत चर्चा करून हा हप्ता नेमका कसा द्यायचा? हे ठरवलं जाईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की ही योजना सुरूच राहणार आहे. मात्र अडीच लाखांच्यावर ज्यांचं उत्पन्न आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. ज्या महिला कर भरतात त्यांचा अर्ज या योजनेसाठी अपेक्षित नसल्याचं देखील यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.