राज्यातील घडामोडींना वेग आला असून अनेक मुद्द्यांवर राज्यातील नेते आपली टिप्पणी देताना दिसत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर केलेल्या विधानाची राज्यभरात चर्चा झाली होती. मलाही अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण योग येत नाहीये, असं अजित पवार हसत-हसत म्हणाले होते. दरम्यान, आता नांदेडमधील मोठे नेते तथा माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर यांनी अजितदादांना मुख्यमंत्रिपद मिळणार, असं भाकित केलं आहे.
नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भास्करराव खतगावरकर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं. विशेष म्हणजे सध्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीत जाणार आहेत, असंही भाकीत त्यांनी केलंय.
“दादा माझं भाकीत खरं होतं. मी अशोक चव्हाण यांना म्हटलं होतं तुम्ही मुख्यमंत्री व्हाल ते मुख्यमंत्री झाले. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये राजकीय चर्चा होते. तिथे अशी चर्चा आहे की येत्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणीस दिल्लीला जातील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल,” असं खतगावकर म्हणाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही नांदेडमध्ये सत्कार घ्यावा अशी विनंतीही खतगावकर यांनी अजित पवार यांना केली.