‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट स्वामी समर्थांवर आधारित आहे. येत्या सोमवारी २८ मार्चला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी निर्मात्यांची योजना होती. मात्र, सेन्सॉर बोर्डाने अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आता मनसेचा संताप झाला आहे.
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज अचानक मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात धडक दिली. ‘मी पाठीशी आहे’ या मराठी चित्रपटाला प्रदर्शनसाठी अद्याप सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर अमेय खोपकर यांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली.
‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट स्वामी समर्थांवर आधारित आहे. येत्या सोमवारी २८ मार्चला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी निर्मात्यांची योजना होती. मात्र, सेन्सॉर बोर्डाने अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे चित्रपटाचे निर्माते मयूर खरात यांनी मनसेकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमेय खोपकर हे आज मयूर खरात यांच्यासह सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना एकही जबाबदार अधिकारी जागेवर आढळला नाही. यामुळे संतप्त झालेल्या अमेय खोपकर यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.
यानंतर अमेय खोपकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणत होते की , “माझ्या सरकारकडे दोन मागण्या आहेत. यातील पहिली मागणी म्हणजे राज्य सरकारने पाठपुरावा करून मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे. दुसरी मागणी म्हणजे सध्याचे चेअरमन प्रसून जोशी यांची तातडीने हकालपट्टी करावी. महाराष्ट्रात मराठी निर्मात्यांना त्रास होतोच कसा?” असा सवाल अमेय खोपकरांनी केला.