महिलांवर होणारे कौटूंबिक अत्याचार आजही घडत आहेत. हे प्रमाण कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.दरम्यान, पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक संतापजनक घटना आता समोर आली आहे.

नाशिकमधीलउच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भक्ती अपूर्व गुजराथी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. तिची सासू, सासरे, पती, नणंद ही सासरची मंडळी तिला त्रास देत होती, असा आरोप तिच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी केला आहे. या आत्महत्येप्रकरणी नातेवाईकांनी शंका व्यक्त करत गंगापूर पोलीस ठाणे गाठले. आपली कैफियत मांडत भक्तीला न्याय द्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराथी यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराथी (37) यांनी घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायने सराफी आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.
भक्ती अथर्व गुजराती यांना 5 वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी भक्तीचा फरार पती अथर्व गुजराती यास लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अटक करा, अटक करा, दोषींना अटक करा, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, अशा आशयाचे फलक अंत्ययात्रेत झळकावले.