वेफर्स, बिस्किटे, शीतपेये आणि झटपट तयार होणारे खाद्यपदार्थ हे आज अनेकांच्या दैनंदिन आहाराचा भाग बनले आहेत. काही मोठे मानस तर लहान मुलांचे हे आवडते आणि रोजचे खाण्याचे पदार्थ झाले आहेत. परंतु आता सावधान व्हा. कारण आता याच पॅकेजिंग फूड बाबत एक गंभीर आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे.
नेटफर्स्ट आणि त्यांच्या ‘ट्रुथइन’ यांनी केलेल्या एका मोठ्या विश्लेषणातून भारतातील पॅकेज्ड फूड उद्योगाचा पर्दाफाश झाला आहे. यानुसार देशातील ८० टक्के पेक्षा जास्त पॅकेज्ड फूडमध्ये कृत्रिम स्वाद, रंग आणि साखरेचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा खूप जास्त असल्याचे उघड झाले आहे.
या अहवालात आधुनिक एआय (AI) साधनांचा वापर करून २५ पेक्षा जास्त श्रेणींमधील सुमारे २३,००० खाद्य उत्पादनांच्या लेबल्सचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे, ज्याचे निष्कर्ष अत्यंत चिंताजनक आहेत. या संशोधनातून समोर आलेली आकडेवारी डोळे उघडणारी आहे
यानुसार साधारण ८० टक्क्यांपेक्षा जास्त बिस्किटांमध्ये कृत्रिम स्वाद (आर्टिफिशियल फ्लेवर्स) आणि स्वस्त पाम तेलाचा (Palm Oil) सर्रास वापर केला जात आहे. तब्बल ९८ टक्के कोल्ड ड्रिंक्समध्ये आरोग्याला हानिकारक असणारे कृत्रिम घटक आढळले आहेत. जवळपास ९६% झटपट तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कृत्रिम घटकांचा वापर करण्यात येतो. यातील ९० टक्के पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. गोड चॉकलेट्स आणि डेसर्टमध्ये ८०% पेक्षा जास्त अतिरिक्त साखर (एडेड शुगर) आणि फॅट आढळले आहे, जे आरोग्याच्या सर्व मानकांचे उल्लंघन करते. सकाळी खाल्ल्या जाणाऱ्या नाश्ताच्या पदार्थांमध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कृत्रिम घटकांची भेसळ असल्याचे समोर आले आहे.
‘ट्रुथइन’चे डॉक्टर अमन शेख बशीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या पॅक केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये जास्त फॅट, साखर, मीठ आणि कृत्रिम स्वादांचे एकसारखेच धोकादायक पॅटर्न पाहायला मिळत आहे. कंपन्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी रसायनांचा हा खेळ खेळत आहेत. या अहवालात ‘राष्ट्रीय पोषण संस्थान’ (NIN) च्या एका अभ्यासाचा हवाला देण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार, देशातील ७५.४ टक्के ग्राहक फूड पॅकेटवर असलेला लेबल वाचत असल्याचा दावा करतात. मात्र त्यातील केवळ १४.७ टक्के लोकच पाकिटाच्या मागे दिलेली घटकांची यादी (Ingredients List) लक्षपूर्वक पाहतात. ग्राहकांच्या याच निष्काळजीपणाचा फायदा कंपन्या घेत आहेत. सध्या पॅकेज्ड फूडची वाढती क्रेझ आपल्या पुढच्या पिढीला लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचे शिकार बनवत आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे खरेदी करताना केवळ चव न पाहता पदार्थांमधील घटकांची तपासणी करणे आता अनिवार्य झाले आहे.