देशात सध्या उकाड्याने कहर केला असून सूर्य आग ओकतोय तर काही ठिकाणी मात्र अवकाळीने सुरुवात केली असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीनुसार, प्रचंड वेगाने संकट वाटचाल करत असून महाराष्ट्रालाही मोठा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, देशात मान्सूनची एन्ट्री कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भारतीय हवामान विभाग (IMD) कडून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुढील 48 तासांमध्ये वातावरणात मोठा उलटफेर पहायला मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये प्रतितास 100 किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने वादळ येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच, मान्सून भारताच्या दिशेनं वेगानं पुढे सरकत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीपच्या काही भागांमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे, अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये निसर्गाचं रौद्र रूप पहायला मिळू शकतं. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगढमध्ये प्रति तास 100 कीमी वेगाने वादळ येण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, गारपीट देखील होऊ शकते. हरियासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातल्या काही भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हयांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अजूनही विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे.