इराण - अमेरिका संघर्षाने सामान्य माणसाच्या खिशाला चांगल्याच झळा बसवल्या आहेत. सतत होणाऱ्या महागाईने सर्वसामान्य आता त्रस्त झाला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाल्याने सामन्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशात सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असून, आज शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरात ८७ ते ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या आत झालेली ही तिसरी मोठी दरवाढ आहे. या नव्या वाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आता थेट शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या घडामोडींमुळे तेल कंपन्यांवर असलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही दरवाढ सलगपणे लागू केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
नव्या दरवाढीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे आधी ९८.६४ रुपये प्रति लिटर मिळणारे पेट्रोल आता ९९.५१ रुपयांवर गेले आहे. दुसरीकडे, डिझेलच्या दरातही प्रति लिटर ९१ पैशांची मोठी वाढ करण्यात आली असून, दिल्लीत डिझेल ९१.५८ रुपयांवरून थेट ९२.४९ रुपयांवर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोल आता अवघ्या ४९ पैशांनी शंभरी गाठण्यापासून दूर आहे, तर मुंबईसह देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलने आधीच शंभरी पार केली असून आजच्या वाढीमुळे ते आणखी महाग झाले आहे.
१५ मे पासून सलग तिसऱ्यांदा दरवाढ झाली. 15 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. १९ मे रोजी पुन्हा एकदा ९० पैशांची दरवाढ झाली. आज पुन्हा एकदा ८७ ते ९१ पैशांची वाढ झाली आहे. या सर्व वाढींची एकूण गोळाबेरीज केली, तर गेल्या अवघ्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर जवळपास ५ रुपयांनी वाढलं आहे.