राज्यातील हवामानात कमालीचे बदल होत असून काही दिवसांपासून उष्णतेने कहर केला आहे.अनेक राज्यात तर नागरिकांनी उष्मघाताच्या त्रासाने त्रस्त करून सोडले आहे तर खाई ठिकाणी उष्माघाताचे बळी गेले आहेत. दरम्यान, आता राज्यात उष्णतेची लाट कायम असून आता राज्यातील 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
मुंबईत 29 एप्रिलला सकाळी उष्णता सौम्य राहून दुपारच्या वेळी तापमानात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आकाश निरभ्र राहू शकते. 29 एप्रिलला पुण्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहणार असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके जास्तच सहन करावे लागू शकतात.
छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असू शकते. या ठिकाणी सुद्धा नागरिकांना उन्हापासून चांगलाच त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. त्यामुळे उन्हाच्या झळांनी नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
नागपूरमधील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तेथील तापमानात आणखी वाढ होताना दिसून येत आहे. नागपूरमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस विदर्भात पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागात सतत वाढणाऱ्या तापमानामुळे उष्माघात, डिहायड्रेशन यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालणे, शरीर झाकलेले ठेवणे, भरपूर पाणी प्यावे आणि थेट सूर्यप्रकाशात जास्त काळ राहणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.