देवळा : राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावर राहुड घाटाच्या पायथ्याजवळ चार वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यात बसवाहकासह सात प्रवाशी जखमी झाले असून, रस्ता ओलांडणाऱ्या १३ मेंढ्या चिरडल्या गेल्या. विशेष म्हणजे या अपघातात दोन बसेसचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे कि, राहुड घाटाच्या पायथ्याशी दोन बसेस, एक विटा भरलेला तर दुसरा कांद्याचा ट्रक अशा चार वाहनांचा अपघात झाला. त्यात ठाणे डेपोची बस (एमएच२० बीएल ३७२७) चा अतीवेग असल्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्या चिरडत बस पुढे थांबली.
यावेळी हि बस प्रवाशांनी भरलेली होती. या बसमधील प्रवाशांची सोय म्हणून येणारी बस (क्र. एमएच१४ केक्यु ०६५७) मध्ये प्रवाशी चढत असताना अचानक मागुन कांद्याच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने या कांद्याचा ट्रकने या बसला मागुन धडक दिली. एवढ्यावरच हा अपघात थांबला नाही तर पुढे विटांच्या ट्रक (एमएच१५ इजी ५९६७) ला धडक दिल्याने हा ट्रक पल्टी झाला.
स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करुन प्रवाश्याना बाहेर काढले व वैद्यकीय सेवेसाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. या ठिकाणी आतापर्यंत अनेक वेळा अपघात झाले असून येथे काहीतरी विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. यावेळी देवळा तसेच चांदवड पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, कैलास गुजर, दामोधर काळे, चांदवडचे वाघ घटनास्थळी उपस्थित होते.