पोलीस कर्मचाऱ्याचं धक्कादायक कृत्य ! 18 वर्षीय विद्यार्थाला तोंडात रुमालाचा बोळा कोंबून बेदम मारहाण
पोलीस कर्मचाऱ्याचं धक्कादायक कृत्य ! 18 वर्षीय विद्यार्थाला तोंडात रुमालाचा बोळा कोंबून बेदम मारहाण
img
दैनिक भ्रमर
नीटची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थाला पोलीस कर्मचाऱ्याने हॉस्टेलवर बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे,  हॉस्टेलमधील रुममध्येच त्याला मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे. 

 याप्रकरणी संबंधित पोलीस शिपायाचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलिसांनी  मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर येताच या घटनेची दखल घेत भाग्यनगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी आकाश सावंतसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याशिवाय पोलीस कर्मचारी आकाश सावंत त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.  

माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा 18 वर्षीय विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करतोय. शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेल मध्ये तो राहतो. 5 जानेवारी रोजी पोलीस कर्मचारी आकाश सावंत तिथे आला, त्याच्या सोबत क्षितिज कांबळे आणि श्रावण हे अन्य दोन तरुण आले. मोटारसायकल आणि सोन्याची चेन चोरी केली का? असं विचारून तिघांनी प्रथमेशला बाहेर नेले. त्यानंतर, अशोक नगर, गोकुळनगर, आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला, पुन्हा प्रथमेशच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला काठीने जबर मारहाण केली. घाबरलेल्या मुलाने काही दिवस हा घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, त्याच्या वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी थेट भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यावरून पोलिसांनी आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group