राज्यात गुंजेगारीचे प्रमाण वाढले असून अवैध रित्या व्याजाने पैसे देणे यातून लोकांची मोठ्या प्रमाणात लूट करणे असे अनेक प्रकार घडत असून आता अशीच एक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये भिशीच्या नावाखाली अवैध सावकारी सुरू असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. ही अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभाग सतर्क झाला असून जिल्हाभर धाडसत्र सुरू करण्यात आलंय. आतापर्यंत 4 ठिकाणी धाडी टाकल्या असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.
नुकतेच विभागीय उपनिबंधक सुरेखा फुलाटे यांनी शहरातील नंदनवन कॉलनीत धाड टाकली. यामध्ये चारुशीला प्रभाकर इंगळे या अवैध महिला सावकाराच्या घरी घबाडच सापडले. इंगळे यांच्याकडे स्टार कासव आढळले. त्यांची सावकारी गेल्या 7 वर्षांपासून सुरू होती. पण अधिकाऱ्यांना याची भणकही नव्हती. लाखोंचे प्लॉट या अवैध सावकारीच्या माध्यमातून बळकावण्यात आले होते.
लाखाच्या कर्जावर महिला 30 हजार व्याज
एक लाख रुपयांच्या कर्जावर ही महिला सावकार 30 हजार व्याज घेत होती. घरकाम करणाऱ्या महिला, कंपनी कामगार आणि इतरही लोक या कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. 50 महिलांचे बँक पासबुक, कोरे धनादेश, कर्जाच्या नोंदवह्या या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुरेखा फुलाटे यांच्या नेतृत्वाखाली जानेवारीपासून आतापर्यंत विविध 4 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.