आजकाल अनेक अशा घटना समोर येत आहेत की त्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण होते. एकीकडे जग खूप पुढे चाललंय तर दुसरीकडे काही घटना अशा घडत आहेत की लोकांमध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण आणि मागास विचार किती आहेत याची प्रचिती येते. अशीच एक अत्यंत धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे.
काळी जादू केल्याच्या आरोपावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेलागावकऱ्यांनी मारहाण करत तिला लघवी पाजली. तसेच कुत्र्याची विष्ठा खायला लावली. एवढंच नाही तर मिरच्यांचा धूर दिला. याशिवाय, महिलेच्या गळ्यात चप्पलांची माळ घातली आणि गावभर तिची धींड काढली. ही घटना 30 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील रेत्याखेडा गावात घडली. पीडित महिलेवर काळी जादू केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर तिला शेजाऱ्यांनी तसेच गावातील इतर लोकांनी जबर मारहाण केली. 5 जानेवारी रोजी पीडितेचा मुलगा आणि सून कामावरून परतल्यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 30 डिसेंबरला सकाळी घरी एकटी असताना गावप्रमुखासह शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांनी तिला दोरीने बांधले आणि काठ्यांनी मारहाण केली. हल्लेखोरांनी तिला गरम लोखंडी सळ्यांनी डागले, मिरचीचा धूर श्वास घेण्यास भाग पाडणे, मूत्र पाजणे आणि कुत्र्याचे विष्ठा खाण्यास भाग पाडले. तसेच हल्लेखोरांनी तिला चप्पलांचा हार घालून गावातून फिरवले.
दरम्यान, पीडित महिलेच्या मुलाने आणि सुनेने याप्रकरणी 5 जानेवारी रोजी पोलिस तक्रार दाखल केली. या तक्रारीत पोलिस पाटीलसह अनेक ग्रामस्थांचा या घटनेत सहभाग असल्याचा आरोप आहे. या धक्कादायक घटनेनंतर अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत अद्याप कोणतेही आरोप दाखल झालेले नाहीत. पीडिता आणि तिच्या कुटुंबाने 17 जानेवारी रोजी न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत कारवाईची मागणी केली आहे.
तथापी, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटिया यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अतिरिक्त तपशील तपासण्यासाठी आणि हल्लेखोर अशा इतर कोणत्याही कारवायांमध्ये सहभागी होते का? याची चौकशी केली जाईल. गरज पडल्यास अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे वाढवता येतील.