डिसेंबर महिन्यापासून राज्यातील वातावरणात सतत काहींना काही बदल होत आहेत. या आठवड्यात राजभरात थंडीचा कडाका वाढला असून राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभरात कडाक्याची थंडी असल्याचं जाणवत आहे. परंतु 9, 10 आणि 11 जानेवारी रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार असून किमान आणि कमाल तापमानात देखील वाढ होणार आहे. तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुके असणार आहे तर त्यानंतर आकाश ढगाळ राहणार आहे तर मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहील. मुंबईतील किमान तापमानामध्ये लक्षणीय वाढ होणार असून थंडी कमी होणार आहे. तर पुणे शहरामध्ये मुंबई प्रमाणेच सकाळच्या वेळी धुके तसेच त्यानंतर ढगाळ आकाश राहील तर पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहील पुण्यामध्ये ढगाळ आकाशाबरोबर थंडी देखील कायम असणार आहे.
तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश 9 जानेवारी रोजी राहणार आहे तर संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहील. तर संभाजीनगरमध्ये 11 आणि 12 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर बरोबरच नाशिकमध्ये ही 10 जानेवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. 9 जानेवारी रोजी नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहील तर सकाळच्या वेळी धुके तर त्यानंतर ढगाळ आकाश राहील.
तसेच , राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मात्र निरभ्र आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढे राहील. नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत पुढील दोन-तीन दिवस राज्यामध्ये ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर विदर्भामध्ये मात्र थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.