नाशिक - पंचवटीतील श्री केशवराजअपार्टमेंट मध्ये पार्किंगच्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिरावाडी येथील श्री केशवराज अपार्टमेंट मध्ये राहणारे बुद्धन विश्वकर्मा यांचे अपार्टमेंटमधील काही नागरिकांशी पार्किंग वरून वाद झाले होते. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. काल सायंकाळच्या सुमारास काही जण विश्वकर्मा यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या बायकोला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलालाही मारहाण केली आणि स्वतः बुद्धन विश्वकर्मा यांनाही मारहाण केली.
विश्वकर्मा हे आपल्या पत्नीला घेऊन जिल्हा रुग्णालयात गेले आणि त्या ठिकाणी दरवाजाजवळ गेले असताना त्यांच्या डोक्याला लागलेल्या मारहाणीत दुखापतीमुळे रक्तस्राव वाढल्याने त्यांचा रुग्णालयाच्या दरवाजातच मृत्यू झाला. या घटनेनंतर तातडीने रुग्णालय प्रशासन करून याबाबतची माहिती पंचवटी पोलिसांना दिली. त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पंचवटी पोलिसांनी संशयित वसंत निवृत्ती घोडे (वय ४७), कल्पना वसंत घोडे (वय ४६), विशाल वसंत घोडे (वय २४), गणेश वसंत घोडे (वय २७, सर्व रा. श्री केशव अपार्टमेंट, दामोदर राज नगर, हिरावाडी, पंचवटी) यांना ताब्यात घेतले आहे.