नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच राज्यातील  ''हे''  अभयारण्य राहणार बंद
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच राज्यातील ''हे'' अभयारण्य राहणार बंद
img
दैनिक भ्रमर
डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असून काही दिवसातच आता आपण नववर्षात पदार्पण करणार आहोत. आता नवीन वर्ष   म्हंटल की  बरेच जण पर्यटनाचा  प्लॅन करत असतात. या पार्श्वभूमीवर जर कोणी  कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य फिरायला जाण्याचा प्लॅन करणार असाल तर ही बातमी त्यांच्यासाठी महत्वाची आहे. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच  हे अभयारण्य दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हा पर्यटनाच्या बाबतीत एक महत्त्वाचा तालुका आहे. याच तालुक्यात भारतातील सगळ्यात जुने असे दाजीपूर अभयारण्य आहे. गव्यांबरोबरच अजूनही बऱ्याच वन्यजीव आणि वृक्ष संपदेसाठी हे अभयारण्य खास प्रसिद्ध आहे. त्यामुळे या अभयारण्याला भेट देण्यासाठी बरेचसे पर्यटक येत असतात. मात्र दिनांक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दोन दिवशी हे अभयारण्य बंद राहणार आहे, अशी माहिती विभागीय वनअधिकारी एस एस पवार (वन्यजीव) व वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली आहे.

दरम्यान , 31 डिसेंबर दिवशी वर्षाअखेरचे सेलिब्रेशन त्याचबरोबर 1 जानेवारीला नववर्षाचे स्वागत यासाठी बाहेरून येऊन हुल्लडबाजी करण्याचे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे वन्यजीव विभागाकडून खबरदारी म्हणून या दोन दिवसासाठी अभयारण्य बंद ठेवण्यात येणार आहे. अभयारण्य क्षेत्रात वन्य विभागाकडून गस्त होत असते. पण या दोन दिवसांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेऊन पेट्रोलिंग केले जाणार आहे, अशी माहिती वनक्षेत्रपालाकडून देण्यात आली आहे. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group