विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले असून महाविकास आघाडीला दारुण पराभव सहन करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचा मोठा दावा केला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल शेवाळे यांच्याकडून हा दावा करण्यात आला आहे. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. राहुल शेवाळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
राहुल शेवाळे यांनी म्हंटले आहे की , 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात, आणि त्यामुळे कुठे न कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो, अशी भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा असा टोला यावेळी राहुल शेवाळे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळं होणार होते. त्यांच्यासोबत वीस आमदार होते. राज्यात महायुतीचं सरकार आलं, मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले होते. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय सरकार बनवण्याचा भाजपचा प्लॅन होता असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं असतानाच आता त्यानंतर राहुल शेवाळे यांनी देखील राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे.