नाशिक :- अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
ही घटना दि. १३ जुन २०२४ रोजी १७:३० वाजेच्या दरम्यान दिंडोरी तालुक्यातील चारोसे शिवारात घडली होती. या गुन्हयातील आरोपी रतन भास्कर गांगोडे याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी (वय २ वर्षे ८ महिने) ही अंगणामध्ये इतर मुलांसोबत खेळत असतांना तिस गावाबाहेरील उसाचे शेतात घेवून जावून तिच्याशी अंगलट करून अतीप्रसंग केला होता. या प्रकरणी गांगोडे यास वणी पोलिसांनी अटक केली होती.
आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती घुले यांच्या न्यायालयात वणी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (२) (फ), ३७६ (अ) (ब), सह लहान मुलांचे लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ४,६ प्रमाणे दाखल खटल्याची सुनावणी पुर्ण झाली. या गुन्हयातील आरोपी रतन भास्कर गांगोडे (वय १९, रा. चारोसे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याच्याविरुध्द आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने आरोपीस आजन्म कारवास व ५०,००० रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद याप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरणकुमार सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे या गुन्हयाचे तपासी अधिकारी वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया पवार, पोना खांडवी यांनी या गुन्हयामध्ये तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास करून यातील गांगोडे विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी अभियोक्ता श्रीमती लिना चव्हाण यांनी, तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा सुजित इंगळे यांनी काम पाहिले.